पाचोरा, दिनांक २९ (प्रतिनिधी ) : दहीहंडी फोडतांना जखमी होऊन मृत्यूमुखी पडलेला गोविंदा नितीन पांडुरंग चौधरी यांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार दहा लक्ष रूपयांची मदत मिळावी अशी मागणी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
पाचोरा येथे यंदाच्या दहीहंडी महोत्सवात नितीन पांडुरंग चौधरी यांचा खाली कोसळून अपघातात मृत्यू झाला होता. या मयत गोविंदाच्या कुटुंबियांना मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर केले.
या निवेदनात नमूद केले आहे की, बाहेरपुरा भागात दहीहंडी उत्सवात थर रचत असतांना झालेल्या अपघातात नितीन पांडुरंग चौधरी यांना प्राण गमवावे लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आधीच कोणत्याही गोविंदाचा दहीहंडी महोत्सवात मृत्यू झाल्यास दहा लाख रूपयांची शासकीय मदत केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लवकरच पाचोरा येथे होणाऱ्या दौऱ्यात कै. नितीन पांडुरंग चौधरी यांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लक्ष रूपयांची मदत प्रदान करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून यावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.
सदर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुपुर्द करतांना दादाभाऊ चौधरी, माजी नगरसेवक संदीप जैन, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मनोज चौधरी, गोविंदाच्या कुटुंबातील सदस्य मुकेश पांडुरंग चौधरी, सागर चौधरी, मनोज चौधरी, राहुल चौधरी, प्रवीण शिंपी, नितीन खेडकर यांच्यासह शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.