पाचोरा, दिनांक ३० (प्रतिनिधी ) : ‘कापसाला भाव नसेल तर ज्वारी-बाजरी लावा या पाचोर्याच्या आमदारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवतांना ना उलटे सल्ले देणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही !” असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या निर्मल सीडसच्या वतीने अटलगव्हाण येथे आज आयोजीत करण्यात आलेल्या प्रगतीशील शेतकर्यांचा सन्मान सोहळा आणि कपाशी, मिरची व भेंडीवरील परिसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या.
आज निर्मल सीडसच्या वतीने अटलगव्हाण येथे आयोजीत कार्यक्रमात प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. निर्मलच्या संशोधन विभागाचे प्रमुख आय.एस. हलकुडे यांनी प्रास्ताविकासह मार्गदर्शन करतांना शेतकर्यांना आधुनीक तंत्राचा आणि सुधारित वाणांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल असे प्रतिपादन केले.
निर्मलच्या संचालिका वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून प्रारंभीच अटलगव्हाण आणि परिसरातील शेतकरी हे कष्टाळू असून तात्यासाहेबांच्या काळापासूनच येथे सीड प्लॉटचे सर्वाधीक उत्पन्न येत असल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या की, कै. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा शेती हाच ध्यास होता. आणि त्यांच्या व्हिजनमधून वाटचाल करत असलेल्या निर्मल समूहाने कायम शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे.
तात्यासाहेबांनी कधी राजकारणातून पैसा कमावला नाही, तर त्यांनी स्वकर्तृत्वाने पुढे जाऊन स्वत:च्या पैशांनी राजकारण केले. त्यांनी लोकांना कायम हिताचे सल्ले दिले. आता पाचोर्याचे आमदार एका कार्यक्रमात कपाशीच्या भावाबद्दल बोलतांना लोकांना कपाशीऐवजी ज्वारी-बाजरी लावण्याचे सल्ले देतात हे चुकीची आहे. त्यांनी कपाशीच्या भावाबाबत बोलण्याऐवजी शेतकर्यांना दुसरेच उत्तर दिले. अशा प्रकारचे उलटे सल्ले देणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही असा टोला वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी मारला.
दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, मी तात्यासाहेबांचा समृध्द वारसा पुढे नेतांना त्यांच्या प्रमाणेच जनहिताचे व्रत हाती घेतले आहे. त्यांच्या प्रमाणेच मी स्वत: कृषी पदवीधर असल्याने मला शेतीच्या आणि शेतकर्यांच्या समस्या माहिती असून याचे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या उमेदवारीबाबत समोरची मंडळी काही अफवा पसरवत असले तरी त्यात काही तथ्य नसल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. याच कार्यक्रमात निर्मल सीडसचे संचालक डी. आर. देशमुख दादा यांनी उपस्थित शेतकर्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देणारे समारोपीय मार्गदर्शन केल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला निर्मल सीडसचे संचालक डी. आर. देशमुख दादा, संचालिका वैशालीताई सुर्यवंशी, संशोधन विभागाचे महाव्यवस्थापक आय.एस. हलकुडे सर, उत्पादन विभागाचे सह महा व्यवस्थापक राजेश चौधरी, उत्पादन विभागाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश बोरसे, विभागीय व्यवस्थापक फाऊंडेशन विभाग किशोर डी. शिंदे, उत्पादन विभागाचे अधिकारी भूषण ए. राजपूत तसेच विश्वनाथ गुलाब तेली, ईश्वर सुरेश पाटील, सुनील सुधाकर पाटील, अशोक मुलचंद तेली, गुलाब किसन तेली, संभाजी रामकृष्ण पाटील, सुरेखा लक्ष्मण पाटील, निता पांडुरंग तेली व मधुकर विश्वनाथ पाटील यांच्यासह मान्यवर व परिसरातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.