पाचोरा, दिनांक ३० (प्रतिनिधी ) : पाचोरा शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असतांना देखील स्वयंघोषीत कार्यसम्राट आमदारांना याची पाहणी करण्यासाठी वेळ नाही का ? असा प्रश्न विचारत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी जोरदार हल्लाबोल करत याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा शहरातील बहुतांश रस्त्यांची सध्या अतिशय भयंकर दुर्दशा झाली असून यामुळे शहरवासियांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. यातच आमदारांना याकडे पाहण्यासाठी लक्ष नसल्याने नागरिक संतापले आहेत. याच मुद्यावरून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना शहरातील रस्त्यांची दुर्दशा दर्शविणार्या छायाचित्रांसह इशारावजा निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा शहराच्या हद्दीतील बहुतांश रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यातील बहुतेक रस्ते हे वयाच्या आधीच म्हातारे झालेले आहेत. कदाचित कंत्राटदाराला पूर्ण रक्कम वापरता आली नसावी, किंवा रस्त्याच्या कामाचा दर्जा मेंटेन ठेवण्याच्या जबाबदारीचे पालन पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले नसावे. तसेच लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या कल्याणाऐवजी त्यांचे व्यक्तीगत हित आणि नफ्याच्या दृष्टीने अधिक पाहिले असावे. म्हणून शहरातील रस्ते हे अधिक प्रमाणात खराब झाले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, एकीकडे स्वयंघोषीत कार्यसम्राट ही पदावली स्वत:ला चिपकावून विकासाच्या गप्पा मारणार्या विद्यमान आमदारांनी या निवेदनासोबत जोडलेल्या रस्त्यांची दुरवस्था पाहण्यासाठी कधी प्रयत्न केले आहेत का ? असा प्रश्न आम्हाला पडतो, अशा प्रकारे टोला यात मारण्यात आला आहे. यात पुढे म्हटले आहे की, मुख्याधिकार्यांनी या निवेदनाच्या सोबत फोटो जोडलेले आणि शहरातील अन्य नादुरूस्त असलेल्या रस्त्यांचे तातडीने चांगल्या दर्जाचे काम करावे. तसेच या कामे केलेल्या रस्त्यांवर शासन निर्णयानुसार डिफॉल्ट लायबलिटी पिरीयडचे बोर्ड ठेकेदाराच्या आणि ठेक्याच्या संबंधातील विस्तृत माहितीसह लावावे. ही सर्व कामे निवडणुकीच्या आधी करावीत अन्यथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
मुख्याधिकार्यांना सदर निवेदन देतांना वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या सोबत दादाभाऊ चौधरी, दीपक पाटील, अनिल सावंत, संजय चौधरी, नितीन खेडकर, संदीप जैन, राजेंद्र राणा, भरत खंडेलवाल, पप्पू जाधव, हरीश देवरे, नामदेव चौधरी, मनोज चौधरी, गफ्फारभाई, अभिषेक खंडेलवाल, अनिल लोहार आणि मनोज चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.