पाचोरा, दिनांक २८ (प्रतिनिधी ) : राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असल्याने सरकारने कठोर शिक्षेची तरत्ूाद असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करावा या मागणीसाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोऱ्यात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
बदलापूरच्या भयंकर घटनेनंतर राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे यातून वेशीवर टांगली गेली असून सक्षम कायद्याच्या अभावी गुन्हेगारांना अगदी जेलमध्ये जाण्याचीही भिती वाटत नसल्याचे आजचे चित्र आहे. याचा निषेध करण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री असतांना शक्ती कायदा विधानसभेत संमत करण्यात आला असला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे हा कायदा तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी ही मोहिम राबविण्यात आली.
पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ केला. यानंतर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पाचोरेकरांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग घेतला. यात महिलांचे प्रमाण हे लक्षणीय असेच होते.